अमरावती -आठ दिवसांपूर्वी कौटुंबिक कलहातून एका व्यक्तीने कुटूंबातील पाच जणांची निर्दयी हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच अशीच धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद समोर आली आहे. आपल्या १६ वर्षीय मुलीची व ४० वर्षीय पत्नीची हत्या करुन पतीनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे. तीन दिवसांपूर्वी थरारक हत्याकांड घडले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर तिनही मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.
पलंगाखाली आढळला पत्नीचा मृतदेह -
मिळालेल्या माहितीनुसार, भामोद येथील रहिवासी अनिल देशमुख वय (४५) यांनी आपली पत्नी व मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील अनेक दिवसांपासून अनिल देशमुख यांचे कौटुंबिक वाद सुरू होते. शुक्रवारी परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी येत होती. यावरून काहीतरी गंभीर घटना घडल्याचा अंदाज नागरिकांनी आला आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अनिल देशमुख यांच्या घरी पाहणी केली असता पलंगाखाली १६ वर्षीय मुलगी साक्षी अनिल देशमुख हिचा मृतदेह आढळून आला. घटनेचा पंचनामा करत असताना पोलिसांना घरातील एका कपाटाजवळ मोठ्या प्रमाणात माशा लागलेल्या दिसल्या. त्यानंतर अधिक जवळ गेले असता मोठ्या प्रमाणात दुर्गंध आल्याने पोलिसांचा संशय बळावला. कपाट उघडले असता त्यातून देशमुख यांची पत्नी वंदना देशमुख (४०) यांचा मृतदेह आढळून आला. याचवेळी घरातील मागच्या एका खोलीत अनिल देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.