अमरावती- शहराच्या पूर्व दिशेला डोंगराच्या कपारीत असणाऱ्या 'महादेव खोरी' या प्राचीन शिवालयात महाशिवरात्री महोत्सव अतिशय थाटात आणि भावभक्तीने साजरा होत आहे. पूर्वी जंगल असणाऱ्या या भागात आता महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा भरते.
अमरावतीलगतच्या प्राचीन महादेव खोरीत महाशिवरात्री महोत्सव
शहराच्या पूर्व दिशेला डोंगराच्या कपारीत असणाऱ्या 'महादेव खोरी' या प्राचीन शिवालयात महाशिवरात्री महोत्सव अतिशय थाटात आणि भावभक्तीने साजरा होत आहे.
शहरापासून काही अंतरावर कोंडेश्वर, तापोवानेश्वर, गडगडेश्वर हे महादेवाचे प्राचीन मंदिर आहेत. ही सर्व शिवालये सपाट भागात आहेत. महादेव खोरीतील शिवाची पिंड ही डोंगरावर एका कपारीत आहे. भाविकांना १३० पायऱ्या चढून महादेव खोरी मंदिरात यावे लागते. महादेवखोरी हे प्राचीन स्थळ असून याचा इतिहासही सापडत नाही. फार पूर्वी घनदाट जंगलाचा परिसर असणाऱ्या या परिसरात डोंगराच्या कपारीत शिवलिंग होते.
सुमारे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी याठिकाणी किल्ल्याच्या स्वरुपातील मंदिर बांधण्यात आले. आजपासून वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत या मंदिरात फारसे भाविक येण्यास धजावत नसत. शहराबाहेरून धृतगती मार्गासाठी या भागातील दगड फोडण्यात आल्यावर महादेव खोरी परिसरात नागरी वस्तीचा विस्तार झाला. आज महादेव खोरीच्या पायथ्यापर्यंत लोकवस्ती वाढली आहे. महाशिवरात्रीला मंदिरात भाविकांची गर्दी उसळते. दुपारी या परिसराला भव्य जत्रेचे स्वरूप येते. शहरातील शिवशक्ती सांस्कृतिक मंडळाच्यावतीने महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाते.