अमरावती- रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पाणी पुरवठ्यासाठीचा कॉक दबला गेला आहे. कॉकच दिसेनासा झाल्याने वडाळी परिसरातील वीस ते पंचवीस घरांच्या नळाला पाणीच येणे बंद झाले आहे.
वडाळी प्रभागात मतांगपूर येथून जीवन प्राधिकरणाची जुनी आणि नवीन पाईपलाईन गेली आहे. या ठिकाणी दोन्ही पाईप लाईनचे कॉक होते. दीड वर्षापूर्वी या परिसरात 15 लाख रुपये खर्चून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. या कामादरम्यान परिसरात पाणी पुरवठ्यासाठी असणारे कॉक जमिनीत दाबण्यात आले. या पाईप लाईनवरून इंद्राशेष महाराज मंदिर परिसरातील वीस ते पंचवीस नळ धारकांच्या नळाला अत्यंत बारीक धार येत आहे.
यापैकी काहींच्या नळाला तर थेंबभरही पाणी येत नाही. आता कडक उन्हाळ्यात वडाळी तलाव आटल्याने परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांनाही पाणी नाही. अशा परिस्थितीत पाण्यापासून वंचित असणाऱ्या नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. चार दिवसांपूर्वी जीवन प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांच्या मजुरांनी काँक्रीटचा रस्ता फोडून कॉक शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र वडाळी प्रभागाच्या नगरसेवकांनी काँक्रीटचा रस्ता फोडण्यास विरोध केला. त्यामुळे कॉक शोधण्याचे काम अर्धवट सोडून जीवन प्राधिकरणाच्या मजुरांनी पळ काढल्याचे तक्रारकर्त्या नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी या प्रकाराविरोधात थेट जीवन प्राधिकारणावर मोर्चा काढल्यावर आज पुन्हा एकदा रस्ता काँक्रीटीकरणात हरवलेला कॉक शोधण्यासाठी खोदकाम सुरू केले. जीवन प्राधिकरणाकडे कॉक कुठे आहे, याची माहितीच नसल्याने अंदाजाने रस्ता फोडून कॉकचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान रस्ता फोडताना जीवन प्राधिकरणाची पाईप लाईन फुटल्याचे आढळून आले. ज्या भागात नळांना पाणी येत नाही, तो प्रश्न कसा सोडविता येईल, या दिशेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाऊल उचलत आहे.