अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे संचारबंदी होती अशातच दारुविक्री करणारे दुकानेही बंद करण्यात आली होती. परंतु ८ मेपासून दारूविक्री करण्याला परवानगी देताच अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, घुईखेडमध्ये देशी-विदेशी दारू दुकानासमोर तळीरामांनी सकाळपासूनच रांगा लागल्याचे चित्र आहे. चांदूर रेल्वेत एक्साईजतर्फे सर्व ग्राहकांची स्क्रिनिंग करण्यात आली. तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सुविधाही उपलब्ध होती.
चांदूर रेल्वेत दारूच्या दुकानाबाहेर मद्यप्रेमींच्या रांगा; स्क्रीनिंग व सॅनिटायझरची सुविधा
चांदूर रेल्वेत एक्साईजतर्फे सर्व ग्राहकांची स्क्रिनींग करण्यात आली. तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध होती.
गेल्या दीड महिन्यापाासून दारूची दुकाने बंद असल्याने अनेक तळीरामांचा जीव कासावीस झाला होता. दारूअभावी घसा कोरडा पडल्याने दारूविक्री सुरू होण्याची वार्ता ऐकताच सर्व मद्यप्रेमी रांगेत ऊभे राहिलेले दिसले. आतापर्यंत कोरोनाच्या अनुषंगाने बंदोबस्तात असलेल्या पोलीस विभागाला दारूच्या दुकानावरील होणारी गर्दी रोखण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळुन दारूविक्री व्हावी यासाठी बंदोबस्त करावा लागतोय, ही नवीनच डोकेदुखी निर्माण झाली आहे.
चांदूर रेल्वे शहरातील वाईन शॉपीसमोर तसेच गावखेड्यात देशी दारूच्या दुकानासमोर मोठी रांगा लागल्याचे चित्र होते. याठिकाणी काही प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत होते. सकाळपासूनच दारू दुकान मालकाची वाट पाहुन मद्यप्रेमी ताटकळत रांगेत उभे होते. देशी दारू सकाळी ८ तर वाईन शॉपी सकाळी १० वाजता उघडल्याने ग्राहकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कोरोनामुळे गरीब, हातावर पोट असणारांचे मोठे हाल होत असले तरी तळीराम मात्र, दारू दुकाने उघडल्याने आनंदात दिसून आले.