महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत विमा कंपनीचे वराती मागून घोडे; संत्रा नुकसानीची पाहणीच नाही

अमरावती जिल्हा संत्रा उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाची उदासीनतेचा फटाका बसत आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसानीची विमा कंपन्यांनी पाहणी केलेली नाही.

By

Published : Mar 14, 2021, 12:16 PM IST

Amravati Orange Production news
अमरावती संत्रा उत्पादन

अमरावती -मागील महिन्यात १७ तारखेला पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. यामुळे मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई परिसरातील शेतपिकांना जबर फटका बसला होता. या अवकाळी पावसामुळे संत्रा झाडांना आलेला बहार पूर्णतः गळून पडला व शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानाची विमा कंपनी व कृषी विभाग यांच्याकडे तक्रार करून सुद्धा या संत्रा नुकसानीची पाहणी करण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी व कर्मचारी आले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून हजारो रुपये उकळणाऱ्या विमा कंपन्या नुकसानीची पाहणी केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अमरावतीमध्ये संत्रा नुकसानीची पाहणी केली गेली नाही
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुका हा विदर्भाचा कॅलोफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात संत्राचे उत्पादन घेतात. दरम्यान, संत्रा बहारावर असताना अचानक १७ फेब्रुवारीला नेर पिंगळाई भागात मुसळधार पाऊस आला. त्यामुळे बहार गळून पडला आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत या संत्रा नुकसानीची तक्रार एचडीएफसी या विमा कंपनीकडे केली. परंतु २२ दिवस उलटुन सुद्धा विमा कंपनीच्या लोकांनी या नुकसानीची पाहणीच केली नसल्याचे संत्रा उत्पादक शेतकरी राहुल मंगळे यांची सांगितले.

तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना निवेदन -

संत्रा बहराच्या झालेल्या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनीला तक्रार करूनही दखल न घेतल्याने या शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी व तहसीलदार यांनाही निवेदन दिले. परंतु, त्यांनी देखील अद्याप यावर तोडगा काढला नसल्याचा आरोप संत्रा उत्पादन शेतकऱ्यांनी केला आहे.

२० ते २५ शेतकऱ्यांना फटका -

नेर पिंगळाई या गावातील २० ते २५ शेतकऱ्यांनी हा विमा काढला आहे. परंतु, त्यांच्याही शेतात अजून नुकसानीची पाहणी झालेली नाही. जर आम्हला न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू, असा इशारा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. येथील शेतकरी सूरज अवचार यांनी दोन हेक्टरचा विमा काढलेला आहे.

आता नुकसान दिसणार नाही -

नुकसान होऊन आता २० दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. तरी सुद्धा या विमा कंपनीच्या लोकांनी पाहणी केलेली नाही. आता जर त्यांनी पाहणी केली तर त्यांना काहीच नुकसान दिसणार नाही. तक्रार केल्यानंतर ५ ते ६ दिवसात नुकसानीचा पंचनामा करणे गरजेचे होते, असे मत संत्रा उत्पादक शेतकरी राहुल मंगळे यांनी व्यक्त केले आहे.

लॉकडाऊनमुळे उशीर झाला -

आम्हाला या शेतकऱ्यांची तक्रार मिळालेली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे पाहणी करण्यास विलंब झाला आहे. आता आम्ही नुकसानीची पाहणी सुरू केली आहे, अशी माहिती एचडीएफसी विमा कंपनीचे कर्मचारी रोशन देशमुख यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details