अमरावती : तळेगाव दशासर येथे 15 जानेवारीपासून शंकरपटाला सुरूवात झाली आहे. काल रात्री शंकरपट पाहून आपल्या घराकडे परत जाणाऱ्या दुचाकीवरील युवकाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने तो जागीच ठार झाला आहे. काल रात्री तळेगाव दशासर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला.
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल :सोमवारी या शंकरपटातील बैलांच्या शर्यती पाहून पुलगाव तालुक्यातील बोदवड मलकापूर येथे घरी परतणाऱ्या आशिष दिनकर ईरपाते वय २५ व त्याचा मित्र अक्षय गजेंद्र शिंदे वय २८ यांच्या दुचाकीला देवगावजवळील अग्रवाल यांच्या शेताजवळ ट्रकने धडक दिली. यात आशिष जागीच ठार झाला, तर अक्षय गंभीर जखमी आहे. तळेगाव पोलीस ठाण्याचे गजेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी अक्षयला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
देवगावजवळ तीन ठार :देवगावजवळ कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांसह कारचालक जागीच ठार झाले. दोघेही मृत पिंपळखुंटा येथील रहिवासी आहेत. संतोष वय 30 असे एका मृताचे नाव असून दुसऱ्या युवकच्या हातावर प्रदीप असे गोंदलेले आहे. मृत कारचालकाचे नाव श्रीकांत पवार वय २२, राहणार अंगाईत, तालुका मोर्शी असल्याचे पोलिसांनी सांगितले. कार ही देवगाववरून जात होती. दुचाकी यवतमाळवरून धामणगावकडे येत होती. देवगावजवळील पाटेकर यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. या घटनेचा अधिक तपास तळेगाव दशासर पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी व सहायक पोलीस निरीक्षक मिश्रा करीत आहे.