ताडोबातील ब्लॅक पँथर पाठोपाठ आता मेळघाटात आढळले दुर्मिळ 'पांढरे अस्वल'
सिपना वन्यजीव विभागाच्या वतीने जंगलात सद्या 600 कॅमेरे लावण्यात आले असून त्यापैकी एका कॅमेऱ्यात चक्क पांढरे अस्वल मेळघाटात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी 2016 मध्ये गुजरातमध्ये तपकिरी रंगाच्या केसांच्या अस्वल आढळले होते. पांढऱ्या रंगाची अस्वल मात्र पहिल्यांदाच मेळघाट सापडले आहे.
दुर्मिळ पांढरे अस्वल
अमरावती- मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ असे पांढरे अस्वल आढळले आहे. सिपना वन्यजीव विभागाच्या वतीने जंगलात सद्या 600 कॅमेरे लावण्यात आले असून त्यापैकी एका कॅमेऱ्यात चक्क पांढरे अस्वल मेळघाटात असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात केवळ मेळघाटात पांढरे अस्वल असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पांढरे अस्वल आढळले असले, तरी संचारबंदीमुळे ते पाहता येत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
ल्युझियम ही एक अशी परिस्थती आहे, ज्यामध्ये शरीरातील रंगद्रव्यांच्या थरांमध्ये अनुवांशिक बदल झाल्यामुळे प्राण्यांचे केस, त्वचा पांढरे होतात. भारतात आजवर अनेक पांढऱ्या रंगांच्या प्राण्यांची नोंद झाली. मात्र पांढऱ्या रंगाचे अस्वल पहिल्यांदाच आढळले आहे. सिपना वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात 4 मार्चला सकाळी 5.39 वाजता ही पांढरी मादा अस्वल टिपली गेली. या पांढऱ्या रंगाच्या मादी अस्वलसोबत काळ्या रंगाच्या नर अस्वलाचेही छायाचित्र टिपण्यात आले आहे. यापूर्वी 2016 मध्ये गुजरातमध्ये तपकिरी रंगाच्या केसांच्या अस्वल आढळले होते. पांढऱ्या रंगाची अस्वल मात्र पहिल्यांदाच मेळघाट सापडले आहे.
जन्मतःच पांढरे अस्वल -
आमच्या कॅमेऱ्यात पांढरे अस्वल मेळघाटात असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात इतर कुठेही पांढरे अस्वल नाही. नर अस्वलाच्या जीन्समध्ये असणाऱ्या या गुणामुळे अस्वलाचा रंग पांढरा झाला आहे. या प्रकाराला अलबिनिझम असे म्हणतात. ही अस्वल जन्मतःच पांढरी असून या अस्वलाकडे अधिक लक्ष दिले जाईल, अशी माहिती मेळघाटातील विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली आहे.