अमरावती- कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता करण्यात आलेल्या टाळेबंदीने अनेक भारतीय नागरिक विदेशात अडकलेत. भारत सरकारकडून भारतीयांना मायदेशी परत आणण्याचं कार्य सुरू आहे. मात्र, भारतीयांना भारतात आणण्याची सरकारने गती वाढवावी, अशी इच्छा नागरिकांनी व्यक्त केली.आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्याने कझाकिस्तान येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विदर्भातील 5 विद्यार्थिनी अडकल्याच समोर आलं आहे.
कझाकिस्तानमध्ये विदर्भातील ५ विद्यार्थिनी अडकल्या, पालकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
लॉकडाऊन झाल्यानंतर या विद्यार्थिनी कझाकिस्तानात अडकून आहेत. त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. त्यामुळे भारत सरकारकडे घरी परतण्याची विनंती केली आहे. धामणगाव रेल्वे येथील आदिती काळे, मंगरूळ द.येथील किरण टोम्पे, बुलडाणा येथील मंजिरी महंत,वर्धा येथील रिया कांबळे व गुंजन बोकडे या विद्यार्थिनी आहेत.
कझाकिस्तानमध्ये वैद्यकिय शिक्षण घेणारे ११३५ विद्यार्थी आहेत. त्यात विदर्भातील ५ विद्यार्थिनी आहेत. वंदे मातरम अंतर्गत येथील ५०२ विद्यार्थ्यांना ७ विमानांनी भारतात आणण्यात आलंय. मात्र, यामध्ये एकही विदर्भातील विद्यार्थी नाही.त्यामुळे विद्यार्थी धास्तावलेत. त्यांना घरी परतण्याची ओढ लागलेली आहे.त्यांच्या पालकांनी अनेक ई-मेल द्वारे मंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय पण यश काही मिळालेलं नाही- काही विद्यार्थी भारतात परतल्याने आम्हाला सुद्धा भारतात परतण्याची आतुरतता लागलेली आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला घरी जाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती अदिती काळे हिने केलीय.