अमरावती- अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय चित्रपट लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज काझी आणि राज कुबेर या चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
अमरावतीमध्ये चित्रपट लेखन कार्यशाळा संपन्न शनिवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत या कार्यशाळेचे उदघाटन आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी केले. या सोहळ्याला अखिल भारतीय चित्रपट महामंडकाचे अध्यक्ष मेघराज भोसले प्रामुख्याने उपस्थित होते.
निशुल्क असणाऱ्या या कार्यशाळेत अमरावती, नागपूर, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा येथून लेखक, नाटककार, कलावंत असे एकूण 115 जण सहभागी झाले होते. चित्रपटासाठी कथानक लिहिताना नेमक्या कुठल्या पद्धतीने लेखन करायचे, एखादा प्रसंग संवादहीन असला की तो प्रसंग कसा रेखाटायचा याबाबत राज काझी यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेबाबत 'ईटीव्ही भरात'शी बोलताना राज काझी म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यातील माणसांकडे खूप काही उत्तम सांगण्यासारखे आहे. या भागातील लोकांना लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी तंत्राची गरज आहे. या तंत्राची माहिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. आजच्या डिजिटल युगात नव्या ऊर्जेला चालना मिळण्याची भरपूर संधी असल्याचेही काझी यांनी सांगितले.
शनिवारी शिवाजी मागविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, नाट्यक्षेत्रातील तज्ञा प्रा. सतीश पावडे, प्रा. नाना देशमुख, डॉ. वर्षा चिखले, कार्यशाळा आयोजनासाठी विशेष धडपड करणारे नरेंद्र मुधोळकर, प्रा. चेतन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यशाळेत सहभागी सर्व सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.