अमरावती - पैशाची आर्थिक देवाण-घेवाण करून अनेकांना अपंगांचे बोगस प्रमाणपत्रे देऊन त्यांची फसवणूक होत असल्याची धक्कादायक माहिती जिल्ह्यात समोर आली आहे. ज्यामध्ये तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील १२ लोकांच्या नावे अपंगांचे बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याने त्यांच्या सखोल चौकशीअंती एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमरावतीत अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र बनवणार मोठे रॅकेट सक्रिय? एकाच गावात आढळले १२ बोगस अपंग प्रमाणपत्रे
अमरावतीमधील तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील १२ लोकांच्या नावे अपंगांचे बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याने त्यांच्या सखोल चौकशीअंती एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एक महिन्यापूर्वी शिरजगाव मोझरी येथील एका प्रकरणात अपंगांची बोगस प्रमाणपत्रे देण्यावरून कारमोरे नावाच्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या कारवाईच्या निमित्ताने आर्थिक देवाण घेवाण करून अपंगांचे बोगस प्रमाणपत्रे देण्याचा मोठा गोरखधंदा जिल्हाभरात सुरू असल्याने यात अनेकांना पोलीस कारवाईला समोर जाण्याची वेळ येणार आहे. प्राप्त माहितीनुसार सध्या गुरुकुंज, मोझरी, शिरजगाव येथील १२ जणांच्या नावे बोगस अपंग प्रमाणपत्र असल्याची नोंद असली तरी हे प्रमाणपत्र कुणी, कसे आणि कोणत्या आधारे दिले हे लवकरच पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी तिवसा पोलीस कसून तपास करत आहेत.
तिवसा पोलिसांनी याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून एका पत्राव्दारे माहिती मागविली आहे. त्यात 'त्या' १२ जणांवर बोगस अपंगांचे प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय योजनेचा लाभ घेण्यात येत असल्याची संशयाची सुई ठेवण्यात आली आहे. जिल्हाभरात अशी किती बोगस प्रमाणपत्रे देण्यात आली, याचा लवकरच पर्दाफाश होणार असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.