अमरावती - गुरुकुंज-मोझरी उपसा सिंचन योजनेची शुक्रवारी प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यात आली. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणावरून चारही बाजूंनी पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. तसेच २३ गावांमधील शेतकरी बांधवाना त्याचा लाभ होणार आहे. या परिसरातील ७१०० हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली आणण्यास मदत होणार आहे. यामुळे सिंचनाचे प्रमाण वाढून कृषी उत्पादकता वाढेल व परिसरातील शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे, असा विश्वास पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
गुरुकुंज-मोझरी उपसा सिंचन योजनेची प्रायोगिक चाचणी; सिंचन क्षेत्रात होणार वाढ
गुरुकुंज-मोझरी उपसा सिंचन योजनेची आज प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यात आली आहे. यामुळे परीसरातील अनेक गावांतील सिंचन क्षेत्र वाढून कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.
ऍड. यशोमती ठाकूर
जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी प्रकल्पाच्या अपूर्ण कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी कोरोना संकटकाळात मनरेगाच्या माध्यमातून अनेक कामे राबविण्यात आली. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही झाली. जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अपूर्ण प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासह गावोगाव जलसंधारणाची कामेही राबविण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.