अमरावती -साहेब आम्ही गरीब आहोत... आमची परिस्थिती नाही... त्यामुळे आम्ही सध्या तुमचे पूर्ण वीजबिल भरू शकत नाही. पण एक पर्याय आहे. आमचे सौभाग्याचे लेणे असलेले हे मंगळसूत्र घ्या आणि ते गहाण ठेऊन त्याचे पैसे तुम्ही घेऊन आमचे बिल भरून टाका, पण आमच्या घरची वीज कापू नका, अशी आर्त हाक अमरावतीमधील महिलांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घालत अनेक महिला आपल्या गळ्यातील मंगळसूत्र घेउन थेट वीज वितरण कार्यलयात पोहोचल्या होत्या. पाहुया एक स्पेशल रिपोर्ट...
हेही वाचा -रायगड; कोरोना काळातील वीजबिल माफ करा; जनशक्ती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लॉकडाऊनमुळे अधिक हाल
लॉकडाऊन काळात महावितरणने राज्यातील लोकांना भरमसाठ बिले दिली खरी, पण ती बिले भरताना आता मात्र सर्वसामान्य जनता किती वेठीस धरली जात आहे, याचे जिवंत उदाहरण हे आता अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावात पाहायला मिळाले. मोझरी गावातील सविता इंगोले यांची परिस्थिती म्हणजे हातावर येईल तेव्हा पोटात जाईल. पती पूर्वी बँड वाजवायचे काम करत. पण कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. दिवसभर भर उन्हात दोघेही जंगलाने फिरत झाडे जमा करायची आणि मग त्याचे झाडू बनवून विकायची. मग त्यातून कुटुंब चालव. परंतु तो व्यवसायसुद्धा कमी झाल्याने परिस्थिती कठीण झाली. त्यातच डोळे पांढरे करायला लावणाऱ्या साडे पंधरा हजारांच्या बिलाचा कागद पाठून या इंगोले कुटुंबाला महावितरणने शॉक दिला.