अमरावती -आपल्याकडे बर्ड फ्लू नाही. आपल्या शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी चिकन आणि अंडी अतिशय उपयुक्त आहेत. बर्ड फ्लू असल्याची अफवा पासरविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जाणार आहेत. नागरिकांनी बर्ड फ्लू बाबत अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्त चिकन आणि अंडी खावीत असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री व यशोमंत्री ठाकूर यांनी केले.
अफवांवर विश्वास ठेवू नका बिनधास्त चिकन, अंडी खा : यशोमती ठाकूर जनजागृतीसाठी चिकन फेस्टिव्हलचे आयोजन -
अमरावती पोल्ट्री फॉर्म असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी दस्तुरनगर परिसरात गुणवंत लॅन येथे बर्ड फ्ल्यूची भीती नसल्याचे सर्व सामान्यांना पटावे, जनजगृती व्हावी यासाठी चिकन फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह माजी महापौर विलास इंगोले, माजी उपमहापौर संध्या टिकले, नगरसेवक सुरेखा लुंगारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले, अमरावती पोल्ट्री फॉर्म असोसिएशनचें प्रमुख डॉ. शरद भरसाकळे, बाबासाहेब रावणकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, डॉ. सचिन बोंद्रे राजीव भोजने आदी उपस्थित होते.
योग्य शिजवलेले चिकन खा -
बर्ड फ्लू आपल्याकडे अजिबात नाही आणि बर्ड फ्लूमुळे माणसांवर काही परिणाम होत नाही. चिकन हे योग्य शिजवलेले असेल तर ते खाण्यात कोणतीही अडचण नाही. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चिकन खाणे गरजेचे आहे. आमच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अनेक योजनांमध्ये गर्भवती महिला, बालकांना अंडी खायला देतो. अंडी आणि चिकन हे खाण्यासाठी उत्कृष्ट असून विनाकारण कुणीही गैरसमज पसरवू नये असेही यशोमती ठाकुर म्हणल्या.