अमरावती -27 वर्षे जुनी असणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जागोजागी फुटली आहे. मात्र गावात आता फुटलेल्या पाईपलाईनमधून पाण्यात घाण कचरा मिसळल्यामुळे प्यायला चक्क गढूळ पाणी आले. गढूळ पाणी पिल्यामुळे गावात अतिसारने थैमान ( Diarrhoea disease Naya Akola Amravati ) घातला आहे. 22 वर्षीय युवकाचा अतिसारमुळे मृत्यू झाला तर 58 जण रुग्णालयात दाखल आहेत. एकूणच सद्यस्थितीत अतिसारमुळे नया अकोला या गावात हाहाकार माजला असताना गावातले सर्व राजकारण बाजूला सारून ग्रामस्थांना प्यायला शुद्ध पाणी मिळावे, इतकीच अपेक्षा ग्रामस्थांची आहे. गावावर कोसळलेले संकट आणखी कोणाचा बळी घेणारे ठरणार नाही, अशीच प्रार्थना ग्रामस्थ करत आहे.
गावात उडाली खळबळ :रविवारी रात्री नया अकोला या गावात आठ वाजताच्या सुमारास नळाला पाणी आले. अंधारात पाणी शुद्ध आहे की अशुद्ध हे कोणालाही कळले नाही. अतिशय घाण असे पाणी अनेकांनी पिले आणि सोमवारी सकाळी गावातील 15 ते 20 जणांना अतिसाराची लागण झाल्याचे उघड झाले. आजारी पडलेल्या काही ग्रामस्थांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर सुशांत दीपक घोम या 22 वर्षीय युवकाची प्रकृती अतिशय ढासळल्यामुळे त्याला उपचारासाठी अमरावतीत आणले जात असताना शेगाव नाका परिसरात त्याने अखेरचा श्वास घेतला. अतिसारामुळे गावातील युवक दगावल्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. सुशांत वर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यानंतर 4 हजार लोकसंख्या असणाऱ्या नया अकोला गावातील वार्ड क्रमांक तीनमध्ये प्रत्येक घरात अतिसाराचा रुग्ण आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.
प्राथमिक शाळा झाली रुग्णालयात परिवर्तित :नया अकोला गावातील 22 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून आठ जणांना अमरावती शहरातील दयासागर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी तिघा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. गावातील 15 जणांना वलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नया अकोला गावातील अतिसाराच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता गावातील प्राथमिक शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालय थाटण्यात आले आहे. प्राथमिक शाळेत टाकण्यात आलेल्या रुग्णालयात मंगळवारी पाच ते सहा जणांना सलाईन लावण्यात आल्या असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे.
ग्रामस्थांना आर्थिक फटका :गावातील ज्या भागात अतिसराची लागण झाली आहे. तो संपूर्ण परिसर सर्वसाधारण कुटुंबीयांचा आहे. या कुटुंबातील ज्या व्यक्तींची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात असून त्यांना उपचारासाठी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वेळेवर पैसे आणायचे कुठून असा प्रश्नही अनेकांसाठी उपस्थित झाला असून गावातील या परिस्थितीबाबत अनेकांनी रोष व्यक्त करीत ग्रामसेवकांसोबत वाद घातल्याचेही गावात आढळून आले.