महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुऱ्हा-पंढरपूर पायदळ वारी 'पंढरी'कडे रवाना; मांजरखेडमध्ये रंगला रिंगण सोहळा

संत चंदाजी महाराज संस्थानतर्फे दिंडीची सुरूवात १७८० मध्ये आप्पाजी महाराज यांनी सुरू केली होती. तेव्हापासून ही दिंडी सुरू असून सर्वात लवकर ही वारी पोहोचत असल्याने तिला वाऱ्याची वारी देखील म्हणतात.

By

Published : Jun 17, 2019, 3:20 PM IST

रिंगण सोहळा

अमरावती- चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील संत चंदाजी महाराज संस्थानतर्फे कुऱ्हा ते पंढरपूर या पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी मांजरखेड (कसबा) येथे या वारीचा भव्य रिंगण सोहळा पार पडला. यामध्ये रिंगण सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर ही वारी पंढरपूरकडे रवाना झाली. केवळ २१ दिवसात ही वारी पंढरपूरला पोहोचणार आहे.

रिंगण सोहळा


आषाढी पौर्णिमा पायदळ वारीचे आयोजन चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथील संत चंदाजी महाराज संस्थानतर्फे करण्यात आले आहे. दिंडीची सुरूवात १७८० मध्ये आप्पाजी महाराज यांनी सुरू केली होती. तेव्हापासून ही दिंडी पुर्वापार चालत आलेली आहे. पिंपळे घराण्याची पाचवी पिढी या दिंडीमध्ये सहभागी झाली आहे. कुऱ्ह्यावरून ही वारी रविवारी मांजरखेड (कसबा) येथे पोहोचली.


या वारीच्या सोहळ्यामध्ये परिसरातील ५ दिंड्या, महिला भजन मंडळ, लेझीम, बँड पथक, २ घोड्यांचा समावेश होता. या दरम्यान अमोल चौकडे यांनी शरबतची तर वॉटरमॅन राजू चर्जन यांनी पाण्याची व्यवस्था केली होती. यानंतर मांजरखेडच्या गोठाणावर रिंगण सोहळा पार पडला. अश्वांना त्यांचा आनंद, त्यांची भक्ती व्यक्त करण्यासाठी रिंगण हे एक माध्यम आहे. या भव्य रिंगण सोहळ्यानंतर वारी दहेगाव धावडेकडे रवाना झाली. ही दिंडी चालत, वाजत, गाजत, भजन, कीर्तन, भारूड करत ऊन-वारा-पाऊस अंगावर झेलत पंढरीसाठी निघाली. ही वारी केवळ २१ दिवसांमध्ये पंढरपूरला पोहोचत असल्यामुळे ही 'वाऱ्याची वारी' म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दिंड्यामध्ये सातवा क्रमांक या दिंडीचा लागतो. वारीत एकूण जवळपास ३०० वारकरी सहभागी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details