अमरावती - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या विजयी झाल्यावर भाजपत तर जाणार नाहीत, तसेच जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसमध्ये ढवळा-ढवळ करून विधनसभा निवडणुकीत दर्यापूर आणि मेळघाट मतदारसंघात काँग्रेसला अडथळा तर आणणार नाहीत, अशा विविध शंकांचे निरसन करून काँग्रेसने आमदार रवी राणा आणि लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून एकनिष्ठेचे आश्वासन घेतले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आज जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकऱ्यांचा मेळावा नवसरी परिसरात आयोजित केला होता. यावेळी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी आमदार खतीब, आमदार यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा, नवनीत राणा, माजी आमदार केवलराम काळे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.
यावेळी बबलू देशमुख यांनी, नवनीत राणा खासदार झाल्या तर आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी त्या बडनेरा मतदारसंघासह दर्यापूर आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघात काम करतील. यासोबतच नवनीत राणा निवडून आल्यावर भाजपसोबत गेल्या तर हा काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत मोठा घात होईल, अशी भीतीही बबलू देशमुख यांनी व्यक्त केली.
आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, आमच्या रक्तात काँग्रेस भिनलेली आहे. पक्षाचा आदेश आम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. सत्ताधाऱ्यांनी आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना प्रचंड दुखावले आहे. अशावेळी लोक म्हणतात, रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, ही बाब आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना खूप खटकणारी आहे. नवनीत राणा या काँग्रेस विचारधारेशी प्रामाणिक राहणार असतील, तर जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे कामाला लागेल.