अमरावती -तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी-रसुलापूर भागात महामार्गची पाहणी करणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्यातही समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहे.
औरंगाबादला देणार भेट -
समृद्धी महामार्ग मुख्य १२ जिल्ह्यांतून जातो. यात अमरावती जिल्ह्याचाही समावेश आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या महामार्गाचे नाव स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हे नामकरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता ते औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातही समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहे.
१२ जिल्ह्यातून जाणारा महामार्ग -
समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे. अप्रत्यक्षपणे काही जिल्हे चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतुकीचा फायदा होणार आहे. जवळपास २६ तालुके व ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.