अमरावती- बडनेरा रेल्वे स्थानकावर चाईल्डलाईन सेवा केंद्र सुरू करण्यात आले. स्थानकावर भटकणारी मुले, हरवलेली बालके तसेच संकटात सापडलेल्या चिमुकल्यांच्या मदतीसाठी हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या केंद्राची पाहाणी केली.
बडनेरा रेल्वेस्थानकावर भटकणाऱ्या मुलांना मिळणार दिशा २४ तास मोफत सेवा-
महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार आणि केंद्रीय दूरसंचार मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, राज्य शासन व चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन, मुंबई यांच्या समन्वयाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. भारत सरकारच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत ही कार्यरत असून बाल न्याय अधिनियम 2015 नुसार संकटात सापडलेल्या बालकांसाठी काळजी व पुनर्वसन सेवा पुरवते. संकटात सापडलेल्या बालक आणि महिलांसाठी 1098 हा टोल फ्री क्रमांक आहे. संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी 24 तास संपूर्ण मोफत आणि भारतातील तातडीची अशी ही टोल फ्री फोन सेवा आहे.
बालकांसोबत महिलांनाही मदत-
लहान मुलांसोबत रेल्वे स्थानकावर अडचणीत सापडलेल्या महिलांनाही या सेवेची मदत व्हावी, असा सल्ला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला. यावेळी बडनेरा रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक मनीष सिन्हा, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वंदना चौधरी, बाल न्याय मंडळाचे सदस्य माधव दंडाले आदी उपस्थित होते.