अमरावती - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, तरीही नवरदेवाची बँड-बाजा घेऊन वरात काढल्याची घटना अमरावतीच्या वरुड येथे घडली. नवरदेवाची घोड्यावरून वरात काढल्याने वधू पक्षाकडील पाच जणांविरुद्ध वरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नवरदेवाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात; नियमांचे उल्लंघन केल्याने वधुपक्षावर गुन्हा दाखल
अमरावतीच्या वरुडमध्ये नवरदेवाची वाजत गाजत वरात काढण्यास सक्त बंदी असताना देखील नवरदेवाची बँड-बाजाच्या साथीने घोड्यावरून वरात काढण्यात आली. कोरोना लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने वधुपक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका कुटुंबातील मुलीच्या विवाहाला तहसीलदारांकडून परवानगी देण्यात आली होती. या विवाहासाठी अमरावती येथून नवरदेव आला होता. दरम्यान, नवरदेवाची वाजत गाजत वरात काढण्यास सक्त बंदी असताना देखील या नवरदेवाची बँड-बाजाच्या साथीने घोड्यावरून वरात काढण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्कचा वापर न करता 30 पेक्षा जास्त वऱ्हाडींनी बँडच्या तालावर ठेका धरला होता.
या प्रकाराची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी वधू पक्षाकडील पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून तपासाअंती नवरदेवा सह वरातीवर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक भगत मेहते यांनी दिली. दरम्यान, संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वधू पक्षावर झालेली जिल्ह्यातील ही पहिली कारवाई आहे.