अमरावती - रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील परतवाडा मार्गावरील जवर्डी फाट्याजवळ बुधवारी एका भरधाव ट्रॅव्हल्सने भाऊ-बहिणीला धडक दिली. या घटनेत बहिणीचा दुर्दैवी अंत झाला असून भाऊ जखमी झाला आहे.
अमरावतीत दुर्दैवी घटना: राखी बांधण्यापूर्वीच भावा-बहिणीचे बंध तुटले
अमरावतीत दुर्दैवी घटना घडली असून रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला भाऊ-बहिणीचा अपघात झाला. या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला आहे.
रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या नात्याची साक्ष देणारा दिवस होय. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर घट्ट राखी बांधून तिच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या भावावर टाकते. भाऊही आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. मात्र, याच रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला रस्ते अपघातात पल्लवी गणेश पाचपोर (१९, परतवाडा) या तरुणीचा मृत्यू झाला आहे.
पल्लवी ही अमरावतीच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गुरुवारी रक्षाबंधन असल्याने बुधवारी तिचा भाऊ तिला आणायला अमरावतीला गेला होता. चांगले शिक्षण घेऊन कुटुंबाचे नाव मोठे करायचे, हे स्वप्न उराशी बाळगणारी पल्लवी बुधवारी आपल्या लाडक्या भावासोबत आनंदात राख्या घेऊन रक्षाबंधनसाठी बांधण्यासाठी घरी येत होती. मात्र, वाटेतच अमरावती-परतवाडा मार्गावरील जवर्डी फाट्याजवळ बुधवारी एका भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली आणि यात तिचा मृत्यू झाला. या घटनेत तिच्या भाऊही किरकोळ जखमी झाला आहे. रक्षाबंधन सणाला पल्लवी कायमचीच सोडून गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.