अमरावती -उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ आज (सोमवारी) किसान समन्वय संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करण्यापूर्वीच अटक केल्यामुळे बडनेरा स्थानकावरून नागपूर आणि अकोलाकडे जाणाऱ्या गाड्या सुरळीत धावत होत्या.
आंदोलनकर्त्यांनी केली घोषणाबाजी
देशात न्याय हक्कासाठी अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्री यांचा मुलगा भरधाव वाहनाखाली चिरडतो. ही घटना निंदनीय असून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या धोरणाविरोधातही आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाचा निषेध नोंदवला. आंदोलनकर्ते बडनेरा रेल्वे स्थानकाच्या परिसरात शिरण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम बसमे, सुनील घटाळे, महेश देशमुख, विजय रोडगे, जितेंद्र कोरडे, विनोद जोशी, लक्ष्मण ठाकरे, प्रवीण काकडे, नितीन गवळी यांच्यासह आंदोलनात सहभागी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.