अमरावती - धारणी तालुक्याच्या दादरा गावातील अंगणवाडी सेविकेने युवा स्वाभिमान पक्षाच्या तालुका अध्यक्षाला पंचायत समिती कार्यालया समोरच धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली. या अंगणवाडी सेविकेने या पदाधिकाऱ्याला का मारहाण केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तालुका अध्यक्षाने ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यात महिलेची तक्रार केली होती, असा दावा युवा स्वाभिमान पक्षाने केला आहे. त्यातूनच हा वाद झाल्याचा अंदाज आहे.
युवा स्वाभिमान पक्षाच्या धारणी तालुका अध्यक्षाला अंगणवाडी सेविकेने धक्काबुक्की केली कॉलर पकडून केली धक्काबुक्की -
बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी स्वत:चा युवा स्वाभिमान पक्ष काढून पक्ष बांधणी सुरू केली आहे. धारणी तालुक्यात युवा स्वाभिमान पक्षाची अध्यक्ष पदाची धुरा दुर्योधन जावरकर यांच्याकडे सोपवलेली आहे. शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयासमोर दादरा गावातील अंगणवाडी सेविकेने अचानक कॉलर पकडून या पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. तिथे उपस्थितांनी त्यांची मारहाण सोडवून भांडण मिटविले. दोघांनीही अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.
युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने तालुका अध्यक्षाला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे निषेध केला. ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान अंगणवाडी सेविकेला तीन अपत्ये असल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यामुळेच त्या महिलेने मारहाण केली, असे पक्षाचे म्हणणे आहे.