महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत पारंपरिक शेतीला फाटा देत युवा शेतकऱ्याने फुलवली केळीची बाग

पाण्याअभावी शेतीचा व्यवसाय धोक्याचा झाल्याचे म्हटलं जात आहे. असे असताना अमरावती जिल्ह्यातील रेवसा गावाच्या एका शेतकऱ्याने आपल्याकडील साडेसात एकर शेतीमध्ये केळीची बाग फुलवली आहे. या केळीच्या बागेतून शेतकऱ्याला वर्षाकाठी निवळ १८ लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

By

Published : Jun 3, 2019, 8:52 AM IST

अभय महल्ले यांच्या शेतातील केळीचा घड

अमरावती- पाण्याअभावी शेतीचा व्यवसाय धोक्याचा झाल्याचे म्हटलं जात आहे. असे असताना अमरावती जिल्ह्यातील रेवसा गावाच्या एका शेतकऱ्याने आपल्याकडील साडेसात एकर शेतीमध्ये केळीची बाग फुलवली आहे. या केळीच्या बागेतून शेतकऱ्याला वर्षाकाठी निवळ १८ लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. अभय महल्ले असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतकरी अभय महल्ले माहिती देताना....


अमरावती जिल्ह्यातील रेवसा तालुक्यातील अभय महल्ले यांच्याकडे वडिलोपार्जित एकूण १५ एकर शेती आहे. महल्ले यांचे वडील आजपर्यंत पारंपरिक शेती करत होते. मात्र, त्यानंतर अभय यांनी शेती कसायला सुरुवात केली. अभय यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग शेती करण्याचे ठरवले. रेवसा परिसरात बहुतांश शेतकरी हे भाजीपाला किंवा फुल शेतीच करतात. मात्र अभय यांनी साडे सात एकरावर टिशू कल्चर जातीच्या केळीची ११ हजार ००० झाडांची बेड पद्धतीने लागवड केली. त्यांनी ही लागवड १५ मे आणि १५ जून २०१८ अशा दोन वेगवेगळ्या तारखांना केली. या बागेला खत आणि पाण्याचे ठिबक सिंचनद्वारे उत्तम नियोजन केले. यामुळे सध्या प्रत्येक झाडाला ३० किलोपर्यंत वजनी घड लागलेला आहे.


केळी बागेसाठी अभय महल्ले यांना एकरी १ लाख रुपये लागवडीचा खर्च आला असून त्यांना २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. लागवडीचा खर्च वजा करुन निवळ उत्पन्न १८ लाख रुपये अभय महल्ले यांना मिळेल असा अंदाज आहे. अभय यांना या शेतीसाठी नातेवाईक प्रशांत कराळे आणि तालुका कृषी अधिकारी अविनाश पांडे यांची मोलाची मदत मिळाली असल्याचे ते आवर्जून सांगतात. अभय यांनी फुलवलेल्या केळीच्या बागेला अनेक शेतकरी भेट देत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details