अमरावती- कालांतराने व्यक्तीची परिस्थिती बदलली की तो गावाला विसरून शहरात रमतो आणि गावाकडे दुर्लक्ष करतो. असे हजारो उदाहरण आपल्यासमोर असताना. मात्र, अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील चेनुष्ठा गावातील आमले कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. हिवाळ्यात थंडी पासून रक्षण व्हावे तसेच, एक भेट वस्तू म्हणून मुलांच्या लग्नानिमित्त आमले कुटुंबाने त्यांच्या मुळ गावातील प्रत्येक घरी दोन ब्लँकेट व मिठाईचे वाटप करून गावकऱ्यांना मायेची ऊब दिली आहे.
तिवसा तालुक्यातील चेनुष्टा हे १५०० लोकसंख्या असलेले गाव आहे. राजेंद्र आमले हे मूळचे चेनुष्ठा गावतील रहिवासी आहेत. परंतु कुटुंबातील सदस्य हे उच्च पदावर कार्यरत असल्याने व ते स्वतः देखील मोठे कंत्राटदार असल्याने ते सध्या नागपूरला राहतात. परंतु, गावातील लोकांशी असलेले सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध ते आजही जपतात. मुलाच्या लग्नाची कुठलीही कसर न ठेवता गावातील सर्वच लोकांना त्यांनी जेवणाची खास मेजवानी दिली. गावाशी असलेली नाळ ही आयुष्यभर टिकून राहावी हा त्यामागील उद्देश्य होता.