अकोला -कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर प्रतिबंध लावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागासोबतच पोलीस दल आणि राज्य परिवहन विभागालाही त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन (आरटीओ) विभागाकडून खासगी बसचालक आणि मालकांची बैठक घेऊन खासगी बसची तपासणी केली जात आहे. बसमध्ये ब्लँकेट, चादर आणि पडदे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. हे साहित्य बसमध्ये दिसल्यास आरटीओ विभागाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा खासगी बस चालक मालकांना देण्यात आला आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्यावर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने खासगी बसला लक्ष केले आहे. खासगी बसमधून प्रवास करताना प्रवाशाला सुविधा प्रवाशाला न देण्याच्या सूचना राज्य परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक तथा सहाय्यक निरीक्षकांकडून देण्यात येत आहेत. त्याबाबत आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी खाजगी बस स्थानक आणि खाजगी बसेसची तपासणी केली. तसेच त्यांची बैठक घेऊन त्यांना कारवाईचा इशाराही दिला आहे. तसेच ज्या बसेसमध्ये ब्लँकेट्स, पडदे आणि चादर मिळून येईल, अशा बसेसवर कारवाई करण्यात येईल. तसेच ठिकठिकाणी खासगी बसेसची तपासणी करून प्रवाशांच्या आरोग्याची विचारपूसही केल्या जाणार आहे.