अकोला - आज वारकऱ्यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. हे फार मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. या राज्यांमध्ये वारकऱ्यांना आत्मदहन करण्याची वेळ आली, हे सरकारचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी व्यथा विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
'वारकऱ्यांवर आत्मदहन करण्याची वेळ आली, हे सरकारचे दुर्दैव म्हणावे'
विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे.
अकोला विमानतळावर उद्या मुख्यमंत्री येणार आहेत, अशी माहिती आहे. त्यांच्या निषेधार्थ सर्व वारकरी मंडळी हे काळ्याफिती लाऊन आमरण उपोषण करणार आहेत. या सरकारला आम्ही आता भीक मागणार नाही. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना एकत्र करून फक्त वारकऱ्यांच्या बळावर आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हा वारकरी करणार आहोत. कारण की वारकऱ्यांची शक्ती काय आहे हे सरकारला कदाचित कळली नसेल. तसेच आपण मुख्यमंत्री होऊ शकतात तर वारकरी तुम्हाला पदावरून खालीसुद्धा काढून दाखवू शकतात, असा इशारा विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी दिला आहे.