अकोला- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधील नरनाळा मुलांचे वसतीगृह या भागात गेल्या तीन दिवसांपासून दोन माकडांनी उपद्रव घातला होता. त्यामधील वसतीगृहात राहणारे विद्यार्थी रामेश्वर ज्ञानेश्वर वावळे व तेथील कर्मचारी हरिदास मिसाळकर यांना माकडांने चावा घेतल्यामुळे ते जखमी झाले होते.
उपद्रव घालणाऱ्या दोन माकडांना 'ट्रेनक्यूलाईझ गण'द्वारे केले जेरबंद हेही वाचा -सिद्धिविनायकाच्या घुमटाला सोन्याची झळाळी
ही माहिती अकोला वनविभाग यांना कळवण्यात आली होती. उपवनसंरक्षक विजय माने व एसीएफ सुरेश वडोदे यांच्या मार्गदर्शनात अकोला वनविभागाचे आर.एफ.ओ. राजसिह ओवे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. त्या माकडांना जेरबंद करण्यासाठी पिंजरेसुद्धा लावले होते. त्यानंतरही पिंजऱ्यामध्ये हे माकडं जेरबंद झाली नाहीत.
दरम्यान, यानंतर अकोला उपवनसंरक्षक विजय माने यांनी अमरावती येथील रॅपिड रिस्पॉन्स युनिट यांना माकडाला जेरबंद करण्यासाठी पाचारण केले. त्या अनुषंगाने अमरावती येथील रॅपिड रिस्पॉन्स युनिट ही रेस्क्यू टीम अकोल्यामध्ये दाखल झाली. त्यांनी कृषी विद्यापीठ परिसरातील नरनाळा वस्तीगृहाच्या परिसरात दोन्ही माकडांची शोध मोहीम सुरू केली. या दोन्ही माकडांना रेस्क्यू करत असताना या माकडांनी त्या कर्मचाऱ्यांवरच हल्ला करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. परंतु, रेस्क्यू टीमचे शूटर अमोल गावनेर यांनी ट्रेनक्यूलाईझ गणद्वारे अचूक निशाणा साधत बेशुद्धीचे इंजेक्शन मारत या माकडांना बेशुद्ध केले. सध्या स्थितीमध्ये हे दोन्ही माकडं अकोला वनविभागाच्या ताब्यात पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आले आहेत.
हेही वाचा -'भारताच्या इतिहासात इंग्रजांना मोठं करण्याचा सैफ अली खानचा प्रयत्न'
पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या माकडांच्या प्रकृतीची संपूर्ण तपासणी केली. तसेच त्या माकडांना जंगलामध्ये सुखरूप सोडण्यात येणार असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अकोला वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने व एसीएफ सुरेश वडोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी राजसिह ओवे, वनपाल प्रकाश गीते, वनरक्षक सरप, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, अनिल चौधरी यांच्यासह अमरावती येथील रेस्क्यू टीमचे शुटर अमोल गावनेर, सतीश उमक, मनोज ठाकूर, वैभव राऊत, पशुवैद्यकीय अधिकारी चोपडे मॅडम आदींनी सहभाग दर्शवला.