अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून दोन रुग्ण बेपत्ता झाले होते. त्यातील एक व्यक्ती देवराव वाघमारे यांचा शोध लागला आहे. तर दुसरी व्यक्ती अविनाश लोखंडे हे अद्यापही बेपत्ता आहेत. या रुग्णांचे नातेवाईक रुग्णालय प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांकडे विचारपूस करतात. मात्र, त्यांच्याकडून तपास सुरू आहे, असेच उत्तर मिळत असल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
अविनाश लोखंडे हा मानसिक रुग्ण पाच वर्षांपासून केळकर सन्मित्र मानस व व्यसनमुक्ती केंद्रात उपचारार्थ दाखल आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात दाखल केल्यापासून ते बेपत्ता आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मूर्तिजापूर येथे सोडले होते. लोखंडे यांचा पत्ता मूर्तिजापूर असा महाविद्यालयात देण्यात आल्यामुळेच त्यांना तिथे सोडण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, लोखंडे यांचे मित्र शिवराज कुलकर्णी यांनी सांगितले की, अविनाश मूळचे अमरावती जिल्ह्यातील असून त्यांचा मूर्तिजापूर या गावाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. असे असताना त्यांना जाणीवपूर्वक तर मूर्तिजापूर येथे सोडून देण्यात आले नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता मानसिकदृष्ट्या आजारी असलेले अविनाश लोखंडे हे मूर्तिजापूरमधून नेमके गेले कुठे? हा प्रश्न आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना घाम गाळावा लागत आहे.
हेही वाचा -अमृत योजनेची कामे पूर्ण करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॉवरवर चढून सिनेस्टाइल आंदोलन