अकोला - गत महिनाभरात जिल्ह्यात 37 गर्भवतींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या गर्भवतींच्या प्रसूतीनंतर नवजात अर्भकांना कोरोनापासून वाचविण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर होते. मात्र, जिल्हा स्त्री रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या विशेष खबरदारीमुळे एकाही नवजात बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. हे आरोग्य यंत्रणेचे मोठे यश मानण्यात येत आहे.
दिलासादायक.. 37 पॉझिटिव्ह बाळंतिणींच्या एकाही नवजात बाळाला कोरोनाचा संसर्ग नाही
अकोल्यात महिन्याभरात या ठिकाणी जवळपास 37 पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती करण्यात आली. त्यातील 14 गर्भवतींचे सिझेरियन झाले असून अशा परिस्थितीत संक्रमणाचा जास्त धोका होता. विशेष बाब म्हणजे, यातील एकाही नवजात शिशुला कोरोनाची बाधा झालेली नाही. बाळंतिणीसह सर्व बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात विशेषतः शहरात कोरोनाचा कहर सुरू झाल्याने कंटेनमेंट झोनची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे या भागातून येणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष दिले जाऊ लागले होते. दरम्यान, अशा भागातून येणाऱ्या गर्भवतींमध्येही कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयांने खबरदारी म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती केली. अशा गर्भवतींचे प्रसूतीपूर्व स्वॅब घेणे सुरू केले. त्यात काही महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. ही संख्या वाढू लागल्याने मध्यंतरी आरोग्य यंत्रणेतर्फे सर्वोपचार रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींसाठी आरक्षित करण्यात आला.
गत महिन्याभरात या ठिकाणी जवळपास 37 पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती करण्यात आली. त्यातील 14 गर्भवतींचे सिझेरियन झाले असून अशा परिस्थितीत संक्रमणाचा जास्त धोका होता. विशेष बाब म्हणजे, यातील एकाही नवजात शिशुला कोरोनाची बाधा झालेली नाही. बाळंतिणीसह सर्व बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.