महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आरोपींना तत्काळ अटक न केल्यास 8 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन'

रेती माफियांवर महसूल विभागच नव्हे तर पोलीस आणि आरटीओ विभागाने कारवाई करायला हवी, अशी अपेक्षा करीत सरकारने रेती घाटाचे लिलाव लवकरात लवकर करावे, अशी मागणीही या अधिकाऱ्यांनी केली आहे.

akola
akola

By

Published : Feb 2, 2021, 7:12 PM IST

Updated : Feb 2, 2021, 8:08 PM IST

अकोला - यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येल नायब तहसीलदार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले आहे. रेती माफियांवर महसूल विभागच नव्हे तर पोलीस आणि आरटीओ विभागाने कारवाई करायला हवी, अशी अपेक्षा करीत सरकारने रेती घाटाचे लिलाव लवकरात लवकर करावे, अशी मागणीही या अधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

आरोपींना तत्काळ पकडण्याची मागणी

उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पाटील यांच्यावर रेती माफियांनी चाकू हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेतील आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ महसूल अधिकारी संघटनेने सामूहिक रजा आंदोलन करीत आरोपींना तत्काळ पकडण्याची मागणी केली. अन्यथा 8 फेब्रुवारी पासून कामबंद आंदोलन करू, असा इशारा संघटनेने दिला आहे.

'रेती घाटांच्या लिलावाचे आदेश द्यावे'

सरकारने अजूनपर्यंत रेती घाटचे लिलाव करण्याचे आदेश दिले नाही. त्यामुळे रेती माफिया हे गौणखनिज चोरी करीत आहेत. यामुळे शासनाचे लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. रेती लिलाव झाल्यास गौणखनिज चोरी थांबेल आणि अधिकाऱ्यांवर हल्ले होणार नाहीत.

'पोलीस आणि आरटीओ विभाग करीत नाही कारवाई'

रेती माफियांवर महसूल अधिकारी कारवाई करतात. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले होतात. परंतु, रेती माफियांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांना असताना ते कारवाई करीत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Last Updated : Feb 2, 2021, 8:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details