अकोला -जालियनवाला हत्याकांड या घटनेला 101 वर्ष होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये हे हत्याकांड इंग्रजांनी केले होते. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत सुरू आहे. त्या ठिकाणी केंद्र सरकार हे आंदोलन चिरडण्यासाठी यासारखेच एखादे हत्याकांड घडवू शकते, अशी भीती शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांनी व्यक्त केली आहे. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्र सरकारने नव्याने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनासंदर्भात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये चर्चाही झाली. परंतु अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. केंद्र सरकार हे जनतेचे माय बाप आहे. जेव्हा एखादे मूल हट्टीपणा करतो, त्यावेळी मायबाप कधीच ताठर भूमिका घेत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आपली भूमिका बदलून जनतेचे हित जोपासावे, असा सल्लाही त्यांनी केंद्र सरकारला दिला.