अकोला - कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीने अनेकांच्या कला समोर आल्या आहेत. अशीच कला मूर्तिजापूर येथील प्रतिक नगरमध्ये राहणाऱ्या कुणाल मांजरे याने जोपासली आहे. त्याने रद्दी कागदापासून सुंदर अष्टविनायक साकारले आहेत. त्याची ही कला अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. इकोफ्रेंडली गणपती तयार करून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना टक्कर दिली असून, रद्दीमधूनही देवाच्या मूर्ती बनविल्या जाऊ शकतात, हे त्याने सिद्ध केले आहे.
रद्दीपासून साकारले इकोफ्रेन्डली अष्टविनायक 'गुगलवरुन अष्टविनायकाचे फोटो गोळा केले'
कुणाल अमरावती येथील शिवाजी महाविद्यालयात डी. एडचा विद्यार्थी आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेक महिन्यांपासून महाविद्यालय बंद असल्याने त्यांचा ऑनलाइन अभ्यास सुरु आहे. सतत घरी व मोबाईलवर राहून कंटाळलेला कुणाल मधला कलांवत जागृत झाला. त्याने गुगलवरुन अष्टविनायकाचे फोटो गोळा करीत, त्या फोटोवरुन घरी असलेल्या रद्दी व वर्तमान पत्र पाण्यात भिजत ठेवून तयार झालेल्या लगद्यापासून उत्कृष्ट अशा आठ गणेशाच्या दीड ते दोन फुट आकाराच्या इकोफ्रेन्डली मूर्त्या साकारल्या आहेत.
'कागदांशिवाय इतर कुठल्याही वस्तूचा वापर नाही'
कागदांशिवाय इतर कुठल्याही वस्तूचा वापर न कारता सुरुवातीला कुणालने तुळजाभवानीचा मुखवटा तयार करुन त्याला तुळजाभवानीचे मुहूर्तस्वरूप दिले. तेव्हापासून विशेष काही करण्याची आवड कुणालला निर्माण झाली. उपजत कला असलेल्या कुणालने निसर्गाचे व पर्यावरण संरक्षणाचे भान ठेवून, केवळ कागदाच्या लगद्यापासून विविध कलाकृती बणवणार असल्याचे सांगितले.
कुठलेही मार्गदर्शन न घेता जे जे सुचत गेले ते ते मी करत गेलो. शाळा व अभ्यास करुन मी ही कला जोपासतो. भविष्यात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने मी ही कला अधिक चांगल्या प्रकारे जोपासणार असे कुणाल सांगतो.