अकोला -शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारात शनिवारी घडली. लक्ष्मण प्रल्हाद सुकोसे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ३ गंभीर जखमी
शेतात मशागतीचे काम केल्यानंतर दहा ते साडे दहाच्या सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले होते. जेवण सुरु असतानाच माकडांनी उड्या मारल्यामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले.
उमरा येथील शेतकरी लक्ष्मण सुकोसे, पत्नी रेखाबाई सुकोसे, मुलगा संतोष सुकोसे व नात पूजा सुकोसे (वय २) हे चौघे जण शनिवारी सकाळी स्वत:च्या शेतात गेले होते. शेतात मशागतीचे काम केल्यानंतर दहा ते साडे दहाच्या सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले होते. जेवण सुरु असतानाच माकडांनी उड्या मारल्यामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले. चवताळलेल्या मधमाशांनी झाडाखाली बसलेल्या सुकोसे कुटुंबीयांवर हल्ला चढवला. यामुळे मधमाशांच्या तावडीतून वाचण्यासाठी ते पळत होते. लक्ष्मण सुकोसे यांचा यात मृत्यू झाला. रेखाबाई सुकोसे, गलगा संतोष सुकोसे आणि नात पूजा सुकोसे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.