महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील दुष्काळ दूर होण्यासाठी शिर्डीत पाच धगधगत्या धुनींच्या मध्यभागी बसून योगींची तपश्चर्या

शिर्डीजवळील कालभैरव मठात योगी खुशीनाथ यांनी तपश्चर्येला सुरुवात केली आहे. राज्यातील दुष्काळ दूर होण्यासाठी योगी ही तपश्चर्या करत असल्याचे त्यांनी सांगितले.

योगी खुशीनाथ

By

Published : May 18, 2019, 9:13 AM IST

शिर्डी- राज्यात दुष्काळाने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे दुष्काळ दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी एक योगी पाच धगधगत्या धुनींच्या मध्यभागी बसून घोर तपश्चर्या करत आहेत. योगी खुशीनाथ, असे तपश्चर्या करणाऱ्या योगींचे नाव असून ते शिर्डीजवळील नपावाडीतील कालभैरव मठात घोर तपश्चर्या करत आहेत.

दुष्काळासाठी तपश्चर्या


राज्यातील काही भागांत मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ही परिस्थिती दूर व्हवी आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडून शेतकरी सुजलाम सुफलम होण्यासाठी योगी खुशीनाथ हे तब्बल 41 दिवसाची उग्र तपश्चर्या करत आहेत. भरदुपारी 11 ते 2 वाजेपर्यंत आजुबाजुच्या पाच धगधगत्या धुनींमध्ये बसून योगी खुशीनाथ ध्यान करत आहेत. योगी खुशीनाथ प्रथम अंघोळ करतात, मग संपूर्ण जटा आणि अंगाला भस्म लेपण करतात. त्यानंतर शंखध्वनी सुरू असताना चोहोबाजुंनी गोवऱ्यानी रचलेल्या धुनीवर मुख्य धुनीतून एकएक पेटती गोवरी ठेवतात आणि सर्व धुनींचे पुजन करून तपश्चर्येला बसतात.


तपश्चर्येच्या पहिल्या दिवशी प्रत्येक धुनीत 49 गोवऱ्या ठेवल्या जातात. त्यानंतर प्रत्येक दिवशी प्रत्येक धुनीत 5 गोवऱ्यांची वाढ करण्यात येते. शेवटच्या टप्प्यात धुनी डोक्याच्याही वर जाते आणि त्याची धग शंभर फुटावरही माणसाला उभे राहू देत नाही. गेल्या तीन वर्षांपासून मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात योगी ही तपश्चर्या करत असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा आणि शेतकरी सुखी समृद्धी राहो हीच प्रार्थना देवाकडे करत असल्याचे योगी खुशीनाथ म्हणतात.


योगी खुशीनाथ हे हरिद्वारच्या नाथ आखाड्याचे साधक आहेत. नाशिकच्या कुंभमेळ्यात योगी खुशीनाथ यांना 12 वर्षांसाठी शिर्डी जवळील नपावाडी येथील कालभैरव मंदिराचे मठाधीपद देण्यात आले आहे.
खुशीनाथ गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात 41 दिवसांची घोर तपश्चर्या करतात. यावर्षी खुशीनाथ यांचे तपश्चर्याचे 4 वर्ष आहे. गेल्या 21 एप्रिल पासून तर 31 मेपर्यंत ही कठोर योगसाधना सुरू राहणार असल्याचे योगी खुशीनाथ यांनी सांगितले.


गेल्या चार वर्षांपूर्वी नपावाडीतील पंचक्रोशीत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी योगी खुशीनाथ यांनी दुष्काळ दूर होऊन चांगला पाऊस पडावा यासाठी ही तपश्चर्या सुरू केली होती. त्यावेळी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई दूर झाली होती. यामुळे खुशीनाथ यांनी दरवर्षींच्या मे महिन्यात ही तपश्चर्या सुरू केली आहेत. यावर्षींही मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने खुशीनाथ यांच्या तपश्चर्याने नक्कीच दुष्काळ दूर होईल आणि पाऊस ही मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे नपावाडी येथील ग्रामस्थ सांगतात. दररोज मोठ्या प्रमाणात भाविक खुशीनाथ यांच्या दर्शांनासाठी हजेरी लावतात. खुशीनाथ यांची कडाक्याच्या उन्हात आणि पाच धगधगत्या धुनींच्या मध्यभागी बसून सुरू असलेली तपश्चर्या पाहून प्रत्येक जण हैराण होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details