अहमदनगर -रात्रीच्या वेळी संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोपरगाव शहरातील दोन हॉटेलवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे. हे दोनही हॉटेल पुढील 7 दिवसांसाठी सील करण्यात आले आहेत.
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण हे झपाट्याने वाढत असून, कोपरगाव शहारासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या शंभरीपार पोहोचली आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाकडून कडक सूचना करत निर्बंध लावण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन हॉटेल बियर बारवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील सात दिवसांसाठी हे हॉटेल सील करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापने ही रात्री 8 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी आहे. मात्र तरी देखील जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.