अहमदनगर - शहरात रविवारी दोन विदेशी नागरिकांचे सराव नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. या दोन विदेशी नागरिकांसोबत एकूण चौदा लोक होते. त्याचबरोबर त्यांचा स्थानिक नागरिकांशी संपर्क आलेला आहे. त्यामुळे एकूणच प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला असून मुकुंदनगर उपनगरात जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी सील केले आहेत. तसेच याठिकाणी पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण, मुकुंदनगर भाग केला सील हेही वाचा...महाराष्ट्र पोलिसांनाही 50 लाखांचे विमा कवच द्या, गृहमंत्री अनिल देशमुखांची मागणी
सध्या कोणत्याही बाहेरील नागरिकाला मुकुंदनगरमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याचप्रमाणे मुकुंदनगरमधील रहिवाशांना घराबाहेर पडण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. आज (सोमवार) आरोग्य विभागाने सकाळपासूनच या उपनगरातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची तपासणी सुरू करण्याचे काम केले. मात्र, यादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे दिसून आले. तसेच अनेक महिला आरोग्यसेविकांनी आपल्याला धक्काबुक्की झाल्याची तक्रार केली आहे. याबाबत भिंगार छावणी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकूण परिस्थिती पाहता पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरात दाखल करण्यात आला आहे. स्वतः जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांनी संपूर्ण मुकुंदनगरमधील नागरिकांशी संवाद साधत, आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितले. तसेच कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या परिसरातील मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.