अहमदनगर -निष्क्रिय आणि निद्रीस्त महाविकास आघाडी सरकारमुळे राज्यातील शेतक-यांवर ‘मागण्यांचा पोळा’ साजरा करण्याची वेळ आली असल्याचा आरोप माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. दूध उत्पादकांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात यासाठी आज बैलपोळा सणाच्या दिवशी लोणी येथे आंदोलन करुन मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी पोस्टाद्वारे पत्र पाठवली आहेत.
आघाडी सरकारमुळे शेतकऱ्यांवर ‘मागण्यांचा पोळा’ साजरा करण्याची वेळ - विखे पाटील
विखे पाटील कुटूंबियांनी गोधनाचे पुजन करुन अतिशय साध्या पध्दतीने पोळा सण साजरा करत मुख्यमंत्र्यांना दूध उत्पादकांच्या मागण्यांचे पत्र पाठवून महादूध आंदोलन आज पासून सुरुवात केले...राज्यातून 5 लाख पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहेत.
राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी भा.ज.पा महायुतीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना 5 लाख पत्र पाठविण्याचे महादूध आंदोलन सुरु करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील आंदोलनाची सुरुवात माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणी येथील पोष्ट कार्यालयातून पत्र पाठवून करण्यात आली. पोळ्याचा आनंददायी सण असतानाही शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येण्यास भाग पाडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. तसेच बैल पोळ्याचा सण हा बळीराजासाठी आनंदाचा दिवस असतो. परंतु या नाकर्त्या सरकारमुळे शेतकऱ्यांच्या नशिबी दु:खाचे सावट आहे. आव्हानात्मक परिस्थितीत शेतकरी सण साजरा करतोय. सर्जा राजाला सजवून मिरवण्याचा दिवस असतानासुध्दा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरुन मागण्यांचा पोळा साजरा करण्याची वेळ या सरकारने आणली हे दुर्दैवी असल्याचे विखे-पाटील म्हणाले आहे.
यापूर्वी राज्यात दूध उत्पादकांची रस्त्यावर उतरुन आंदोलने झाली. सरकार निर्णय घेईल, घोषणा करील अशी अपेक्षा दूध उत्पाकांची होती. परंतु सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे दूध उत्पादकांची चेष्टाच सुरु असल्याची टीका विखे यांनी केली. महिना उलटून गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देवू शकलेले नाही. सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री आणि शेतकऱ्यांचा कैवार असलेले दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाही. म्हणूनच निद्रीस्त आणि निष्क्रीय असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना दूध उत्पादकांचे दु:ख समजावे म्हणून पोळा सणाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना दूध उत्पादकांच्या मागण्यांचे पत्र पाठवून महादूध आंदोलन आजपासुन सुरु केले असून राज्यातून 5 लाख आणि नगर जिल्ह्यातून 10 हजार पत्र पाठविणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.