शिर्डी - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका शिर्डीतील लहान मोठ्या व्यवसायिकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने, दुकान परिसरात असलेले प्रसाद विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रसादांच्या पदार्थाची विक्री न झाल्याने ते फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. याच भाविकांवर मंदिर परिसरात असणारे छोटे मोठे व्यवसायिक अवलंबून असतात. शिर्डीत श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, या उत्सवासाठी देश विदेशतून लाखो भाविक शिर्डीत येतात. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील प्रसाद विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात माल दुकानात भरून ठेवला होता. मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊन लागले, लॉकडाऊन काळात व त्यापुढील काळात देखील अनेक दिवस मंदिर बंद असल्याने हे सर्व पदार्थ फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली. आता देखील त्यांनी मालाची खरेदी केली होती, मात्र मंदिरच बंद असल्याने हे व्यवसायिक पुन्हा एकादा आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत.