शिर्डी (अहमदनगर) - वडिलांबरोबर वैद्यकीय तपासणीसाठी साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयांमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीला रुग्णालयातील डाॅक्टरांनी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने शिर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी संबंधित डॉक्टर विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत (POSCO) गुन्हा दाखल केला असून डॉ. वैभव तांबेला अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार करतना डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग रविवार दि. 19 सप्टेंबरला पहाटे 3.30 वाजता शिर्डी शहरातील अल्पवयीन मुलीस श्वसनाचा अचानक त्रास जाणवू लागल्याने तिच्या वडिलांनी तिला साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कॅज्युलिटी विभागात तपासणीसाठी नेले. तेथे ड्युटीवर असलेला डॉ. वैभव बबन तांबे याने मूलीच्या वडिलांना बाहेर थांबण्यास सांगून मुलीला तपासणीसाठी आत घेतले. तपासणीचा बहाणा करत तिच्या शरीराला नको त्या ठिकाणी हात लावत असल्याने अखेर मुलीनं प्रतिकार केला. त्यानंतर वडिलांना आवाज देवून या रुग्णालयामधून चला, डॉक्टर ‘बॅड टच’ करत असल्याचे सांगितले. यावेळी मुलीच्या वडिलांनी तिला डॉक्टर तपासणी करताना हात लागतो असे सांगत पुढील उपचार घेतले. दरम्यानच्या काळात मुलगी फक्त रडत होती. अखेर उपचार घेतल्यानंतर मुलगी घरी आली आणि आईला सर्व हकिकत सांगितली. मुलीचा गैरसमज झाला असावा, असे वडिलांना वाटल्याने पुन्हा सकाळी 8 वाजता इतर तपासणीसाठी गेल्यावर वडिलांनी मुलीकडे रेकॉर्डींग सुरू करून मोबाईल दिला. यावेळी देखिल डॉ. तांबे याने मुलीशी संपर्क करत “तुझा ह्र्दयाला बॉयफ्रेंडची गरज आहे. तू बॉयफ्रेंड करून घे” अस म्हणत मुलीशी संभाषण केले. आणि हे सर्व संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्यानं अखेर वडिलांना विश्वास बसला आणि आपल्या लहान मुलीबाबत झालेल्या प्रकारामुळे संतापलेल्या मुलीच्या आईने शिर्डी पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरच्या विरोधात तक्रार दाखल केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे यांनी तातडीने शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यादरम्यान पीडित मुलीची विचारपूस केली. त्यांच्या मार्गदर्शनखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी तक्रार दाखल करून घेत आरोपी डॉ. वैभव बबन तांबे यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत 8 व 10 नुसार तसेच भा.द.वि कलम 354 ( अ ),( ब ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी डॉ. वैभव बबन तांबेला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगेसह पोलीस उपनिरिक्षक प्रविण दातरे करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.