अहमदनगर- कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून राज्यातील राज्यातील अनेक महत्वाची मंदिरे कालपासून बंद करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीतील प्रसिद्ध साईबाबांचे मंदिर तसेच शनीशिंगणापूर येथील शनी महाराजांच्या मंदिर बंद करण्यात आलेली आहे.
आज बुधवारी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी शनीशिंगणापूरमध्ये पहावयास मिळाली. मुख्य प्रवेशद्वारावरच बॅरिकेट लावून प्रवेश बंद करण्यात आलेला असून सुरक्षारक्षकांनी तुरळकपणे आलेल्या भाविकांना मंदिरात जाण्यास मनाई केली. त्यामुळे भाविकांनी उदासीमठाच्या मंदिराच्या कळसाचे बाहेरूनच दर्शन घेत शनी देवांचा निरोप घेतला.
चारशे वर्षांत पहिल्यांदाच शनीदेवाचे मंदिर बंद आतमधील मंदिर परिसरात केवळ सुरक्षा आणि सफाई कर्मचारी दिसून आले. चौथऱ्यावरील शनी महाराजांच्या मूर्तीची नियमितपणे सूर्योदय आणि सूर्यास्ताला पुजाऱ्यांकडून आरती होणार आहे. दुसरीकडे शनीशिंगणापूर परिसरात वर्दळ असलेल्या वाहनतळावर तसेच पूजा साहित्य असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये अक्षरशः शुकशुकाट आहे. तसेच प्रसादालयही बंद करण्यात आले आहे. चारशे वर्षांत कधीही मंदिर भक्तांसाठी बंद ठेवले गेलेले नव्हते, असे येथील जाणकार सांगतात. मात्र, सध्या कोरोनाचे संकट असल्याने प्रथमच शनेश्वर देवस्थानच्या वतीने मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे.
हेही वाचा -उझबेकिस्तानमध्ये अडकले महाराष्ट्रातील ३९ पर्यटक, जयंत पाटलांनी साधला संपर्क