अहमदनगर :आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०५.१५ वाजता काकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्ती झाली. श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची द्वारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी वीणा, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ले. कर्नल डॉ. शैलेश ओक व संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी यांनी साईंची प्रतिमा घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला.
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती उत्सव साजरा :सकाळी ०६.३० वाजता तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी सौ. मालती यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मीनाक्षी सालीमठ आणि प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या हस्ते कावडीचे पूजन करण्यात आले.
न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांची सपत्नीक श्रींची पाद्यपूजा :सकाळी ०८.०० वाजता संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी सौ. मालती यार्लगड्डा यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा, लेंडीबागेतील श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे पूजन व द्वारकामाई मंदिरातील गव्हाच्या पोत्याचे पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मीनाक्षी सालीमठ, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते जन्मोत्सव साजरा :सकाळी १०.०० वाजता समाधी मंदिराच्या उत्तर बाजूच्या स्टेजवर ह.भ.प. विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्मावर कीर्तन झाले. कीर्तनानंतर संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी सौ. मालती यार्लगड्डा आणि प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व त्यांची सुविद्य पत्नी सौ. कावेरी जाधव यांच्या हस्ते श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
नवीन निशाणांची विधिवत पूजा :यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी १२.३० साईंची माध्यान्ह आरती झाली. माध्यान्ह आरतीपूर्वी रासने कुटुंबीय व देशपांडे (निमोणकर) कुटुंबीय यांच्या वतीने नवीन निशाणांची विधिवत पूजा करून दुपारी ०४.०० वाजता निशाणांची मिरवणूक काढण्यात आली. तर सायं. ०५.०० वाजता साईंच्या रथाची शिर्डी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.