महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्दीतील माया..! आरोपी झाले फरार.. जनावरांनी हंबरडा फोडताच पोलिसांनी भरवला वैरणीचा घास

लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांची उपासमार होत आहे. अशीच परिस्थिती नेवासा तालुक्यातील काही जनावरांवर आली आहे. मात्र, ही परिस्थिती लॉकडाऊनमुळे नव्हे, तर या जनावरांचा पोशिंदा फरार झाल्यामुळे ओढावली आहे. अशात माणसांच्या मदतीला धावून येणारी खाकी वर्दीतील माणूसकी या जनावरांच्या मदतीलाही धावून आली आहे.

फरार आरोपींच्या घरील जनावरांना पोलिसांनी दिला चारा
फरार आरोपींच्या घरील जनावरांना पोलिसांनी दिला चारा

By

Published : Apr 26, 2020, 1:44 PM IST

Updated : Apr 26, 2020, 3:32 PM IST

अहमदनगर- लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांची उपासमार होत आहे. अशीच परिस्थिती नेवासा तालुक्यातील काही जनावरांवर आली आहे. मात्र, ही परिस्थिती लॉकडाऊनमुळे नव्हे, तर या जनावरांचा पोशिंदा फरार झाल्यामुळे ओढावली आहे. अशात माणसांच्या मदतीला धावून येणारी खाकी वर्दीतील माणुसकी या जनावरांच्याही मदतीला धावून आली आहे.

नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील एका विवाहितेची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. यानंतर तिच्या हत्येचा गुन्हा दाखल होताच संपूर्ण कुटुंब फरार झाले. या कुटुंबाने जिवापाड जपलेल्या जनावरांना वाऱ्यावर सोडून दिले.

कुकाणे पोलीस दुरक्षेत्रातील हेड कॉन्स्टेबल भिमराज पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल आंबादास गिते हे तपास कामासाठी वस्तीवर गेले. यावेळी त्यांना पाहून जनावरांनी हंबरडा फोडला. सहा गाई-म्हशी आणि आठ शेळ्या या घरासमोर होत्या. शेतकरी पुत्र असलेले पवार आणि गीते यांनी या जनावरांच्या भावना ओळखून जवळच शेतात असलेले गवत, घास कापून तसेच ऊस तोडून जनावरांना चारले.

फरार आरोपींच्या घरील जनावरांना पोलिसांनी भरवला चारा

याशिवाय त्यांनी जनावरांना पाणीदेखील पाजले. पवार-गीते यांनी हे काम फक्त एकच दिवस नाही. तर, गेल्या रविवारपासून आजपर्यंत सतत केले. लॉकडाऊनदरम्यान आपले काम सांभाळून त्यांनी मिळालेल्या वेळात सकाळ - सायंकाळ न चुकता या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकी जपली.

जनावरांनी हंबरडा फोडताच पोलिसांनी भरवला वैरणीचा घास

लॉकडाऊनदरम्यान सतत उन्हाच्या झळा सोसत पोलीस आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, अशातही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. याच कारणामुळे अनेकांना लाठ्यांचा चोपही मिळत आहे. अशात एकीकडे नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कठोर बनणारे पोलीस तर दुसरीकडे नागरिक आणि जनावरांच्या मदतीसाठी देवदूताप्रमाणे धावून जाणारे पोलीस माणूसकीचे दर्शन घडवत आहेत.

Last Updated : Apr 26, 2020, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details