शिर्डी- कोपरगाव शहरात सध्या प्लास्टिकची अंडी विक्रीसाठी आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील कोर्ट रोड येथील रहिवाशी तरुण हर्षल डाके याने मंगळवारी रात्री जवळच्या किराणा दुकानातून कोंबडीचे अंडी विकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी ती अंडी उकडली, मात्र, त्यांना उकडलेली अंडी खाताना त्यांना त्या अंड्याची चव वेगळीच लागली. त्यामुळे त्यांनी ती अंडी कुत्र्याला खायला टाकली. मात्र, कुत्र्यानेही त्याला तोंड लावले नाही. बुधवारी सकाळी त्या अंड्याचे रुपांतर प्लास्टिकच्या पदार्थासारखे झाल्याचे आढळून आले.
कारवाईची मागणी-
अंडी बनावट असल्याची शंका आल्याने डोके यांनी ज्या दुकानातून ही अंडी खरेदी केली होती. त्या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित दुकानदाराने ही अंडी कोठून खरेदी केली त्याची, अन्न व औषध प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अंडी तयारी करणारी टोळी सक्रीय?
प्लास्टिक अंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे दुकानांमधून सहजतेने प्लास्टिकची अंडी विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अशा प्रकारे प्लास्टिक अंडी तयारी करणारी टोळी कोपरगाव तालुक्यात सक्रिय झाली आहे का? असा सवाल सर्व सामान्यांना पडला असून अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाकडे गामभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.