अहमदनगर - जिल्ह्यामध्ये आज कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी आठजण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज देण्यात आला. यात, नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील व्यक्तींचा समावेश आहे. सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात आले होते. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ही ९० झाली आहे. तर, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही १८३ वर पोहचली आहे.
आज जिल्ह्यात ६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आझळून आले तर ६१ व्यक्तींचे कोरोना निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. आज मिळालेल्या बाधित रुग्णांमध्ये शेवगाव तालुक्यातील रानेगाव येथील ३२ वर्षीय युवकाचा समावेश आहे. तो यापूर्वी बाधित आढळलेल्या व्यक्तीसोबत मुंबईस जाऊन आला होता. त्यासोबत पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील १० वर्षीय मुलगा, लालबाग येथून घुलेवाडी (पारनेर) येथे आलेली २८ वर्षीय महिला, संगमनेर शहरातील दोनजण, कोल्हेवाडी रोड येथील १८ वर्षीय युवक, नवघरगल्ली येथील ३२ वर्षीय तरुण तर, नगर शहरातील लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झालेली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही १८३ वर पोहचली आहे.