अहमदनगर - उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दांचे पक्के आहेत. एमपीएससी भरतीबाबत त्यांनी दिलेले आश्वासनाच्या पूर्ततेच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चार सदस्यांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे 31 जुलैपूर्वीच नावे पाठवली आहेत. मात्र, ज्या पद्धतीने बारा विधानपरिषद सदस्यांची यादी राज्यपालांनी अद्याप प्रलंबित ठेवली त्या पद्धतीने किमान एमपीएससी बाबतीत ते करणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार पवार यांनी विविध गावांना भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या, यावेळी आमदार पवार हे बोलत होते.
सदस्यांची निवड तातडीने करावी -
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही निवडीसाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे स्वप्नील लोणकर या युवकाने कर्जाच्या तणावाखाली गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्याची घोषणा केली होती. मात्र आयोगाच्या सदस्यांची निवडच झालेली नसल्याने अगोदर ह्या सदस्यांची निवड गरजेची असल्याने चार नावे 31 जुलैपूर्वीच राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. मात्र, या सदस्य निवडीत बारा विधानपरिषद सदस्यांसारखा विलंब लागू शकतो का असे विचारले असता, आमदार पवार यांनी विधानपरिषद सदस्य निवडीतील उशिराबद्दल काहीशी नाराजी व्यक्त करतानाच राज्यपाल किमान एमपीएससी सदस्य निवडीत तसा विलंब करणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, सदस्यांची निवड तातडीने करावी अशी विनंतीही त्यांनी राज्यपालांना केली.