अहमदनगर -राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे रविवारी भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार आहेत. ही भेट विखे पाटलांच्या निवास्थानी होणार आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील व अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना त्यांची मैत्री सर्वपरिचीत होती. दरम्यान आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम करून, भाजपात प्रवेश केला आहे.
मंत्री अब्दुल सत्तार घेणार राधाकृष्ण विखे पाटलांची भेट, कारण गुलदस्त्यात
सत्तार हे रविवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सकाळी 11.30 वाजता ते विखे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची त्यावेळी भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. औरंगाबादमध्ये काँग्रेसची उमेदवारी सुभाष झांबड यांना जाहीर झाल्यानंतर, सत्तार यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. अब्दुल सत्तार भाजपात जातील अशी चर्चा होती, मात्र सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आले. दरम्यान मंत्री सत्तार हे रविवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, सकाळी 11.30 वाजता ते विखे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. मात्र अद्याप त्यांच्या भेटीचे कारण समोर आले नसल्याने विविध चर्चा रंगतांना दिसत आहे.