शिर्डी (अहमदनगर ) - शिर्डी विमानतळाकडे ( Shridi Airpot issue ) करापोटी पाच ते साडेपाच कोटी रुपये थकले आहेत. ही करवसुली करण्याकरिता विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा काकडी ग्रामस्थांनी दिला आहे. मोठ्या प्रमाणात कर थकल्याने गावचा विकास रखडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पाच ते साडेपाच कोटी रुपये करवसुली थकित - २०१७ साली कोपरगाव तालुक्यातील काकडी गावात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ ( Shirdi International Airport ) सुरू झाले. मात्र मागील चार वर्षात काकडी ग्रामपंचायतला कर स्वरूपात मिळणारी ( Kakadi Gram Panchayat ) हक्काची रक्कम अदा करण्यात आली नाही. ही थकीत रक्कम वाढत जाऊन आज घडीला पाच ते साडेपाच कोटी रुपये विमानतळ प्राधिकरणाकडे थकले आहेत. वारंवार मागणी करूनही प्राधिकरणाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत.
विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा- गेल्या अधिवेशनात राज्य सरकारने शिर्डी विमानतळासाठी दीडशे कोटींचा निधी जाहीर केला. मात्र ग्रामपंचायतच्या थकीत काराबाबत कुठलीही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे काकडी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी विमानतळ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. येत्या पंधरा दिवसात थकीत कर अदा करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही तर विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा काकडी गावचे सरपंच पूर्वा गुंजाळ यांनी दिला आहे.
कोट्यवधींचा कर थकल्याने काकडी ग्रामस्थ संतप्त - २००६ साली विमानतळासाठी भूसंपादन सुरू झाल्यानंतर काकडी ग्रामस्थांनी अत्यल्प मोबदल्यात १५०० एकर जमीन दिली. यावेळी स्थानिकांना नोकरीसह गावातील रस्ते, शाळा, पाणी पुरवठा योजना अशी विविध आश्वासने प्राधिकरणाकडून देण्यात आली. मात्र अनेक वर्षे उलटूनही आश्वासने पूर्ण झाली नाहीत. त्यातच कोट्यवधींचा कर थकल्याने काकडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हक्काच्या पैशांसाठी काकडी ग्रामपंचत आणि ग्रामस्थ वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. आता थेट विमानतळालाच टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाला जाग येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा-Fadnavis ON Uke : सतीश उकेंवर महाराष्ट्र लिसांच्या तक्रारीवरूनच ईडीची कारवाई:- देवेंद्र फडणवीस