अहमदनगर - सहा नोव्हेंबरला अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या(Ahmednagar District Civil Hospital Fire) अतिदक्षता विभागात आग लागली होती. यात अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्य सरकारने नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे(radhakrushan game) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. चौकशी समितीची आज (11 नोव्हेंबर) अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
राधाकृष्ण गमे - विभागीय आयुक्त आठ ते दहा विभागांनी सादर केली माहिती-
या बैठकीत चौकशी समितीचे अध्यक्ष गमे यांच्यासह समितीत समावेश असलेले विविध विभागातील तज्ज्ञ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चौकशी समितीने जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीबाबत साधारण आठ ते दहा विविध विभागांकडून माहिती मागवली होती. त्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी समिती समोर हजर होत माहिती सादर केली. ही सर्व माहिती आम्ही अभ्यासली असून, त्यावर समितीला आवश्यक असलेली अतिरिक्त माहिती मागवलेली आहे. ती माहिती येत्या सोमवारपर्यंत मिळेल. त्यानंतर चौकशी समितीची पुन्हा एकदा बैठक होईल. त्यामुळे एकंदरीत सर्व माहितीच्या आधारे चर्चा होऊन, त्याबद्दलचा अहवाल सरकारला सादर केला जाईल, असे गमे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -अहमदनगर रुग्णालय आग : टोपेंसह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - भातखळकर
निलंबित शल्य चिकित्सकांकडून घेतली माहिती-
राज्य सरकारने निलंबित केलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा बैठकीसाठी आढळून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले की, ते समितीमध्ये नसून त्यांच्याकडून चौकशी समितीला आवश्यक असलेली माहिती घेण्यात आली, त्यासाठी त्यांना एक प्रश्नावली देण्यात आल्याचे गमे यांनी सांगितले. त्याचबरोबर फायर ब्रिगेडबाबत एका स्थानिक अधिकारी समितीत असल्याबद्दल आणि त्यांच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेले आरोप, त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण देताना अधिकार्यांचा यामध्ये विषय नसून अनेक तज्ज्ञ लोक समितीमध्ये आहेत. त्यामध्ये राज्य फायर संचालक यांचाही समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित असताना आणि वादग्रस्त ठरत असताना ते आज जिल्हा रुग्णालयात आल्याने मोठी चर्चा आहे, यावर आपणास याबाबत काही माहिती नसल्याचेही गमे म्हणाले.
पोलीस स्वतंत्रपणे चौकशी करत आहे -
पोलीस स्वतंत्रपणे चौकशी करत असून, चार आरोग्य कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. याबद्दल विचारलं असता, पोलिसांच्या तपासासंदर्भात चौकशी समितीचा कोणताही संबंध नाही. पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करतील, चौकशी समिती आपल्या पद्धतीने काम करत असून, समितीचा अहवाल आठ ते दहा दिवसात सरकारला सादर केला जाईल, असे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी दिले.
हेही वाचा -अहमदनगर रुग्णालय आग : पोलीस अधीक्षकांनी केला 'हा' गंभीर खुलासा, चार जणांना अटक केल्याची दिली माहिती