अहमदनगर - देशात, राज्यात आणि नगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगा लागत आहेत. राज्य सरकारला त्याचा पुरेसा पुरवठा होत नाही. भाजपच्या लोकांना मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कसा मिळतो हा प्रश्न मला पडला आहे, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. नगरमध्ये कोरोना विषयक आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार सुजय विखेंवर निशाणा साधला.
फडणवीस आरोपीसाठी पोलीस ठाण्यात गेले -
आपल्याला न्यायालयाच्या निर्णयाबद्दल कसलीही टिप्पणी करायची नाही. मात्र, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांना दीव-दमनमधून पन्नास हजार इंजेक्शनचा साठा मिळतो. त्याविषयी साधी चौकशी केली करण्याचा प्रयत्न झाला तर आरोपीसाठी विरोधीपक्ष नेते थेट पोलीस ठाण्यात येतात. आता नगरमध्येही भाजपच्याच खासदाराला इंजेक्शन उपलब्ध झाले. त्यामुळे मला प्रश्न पडला की, फक्त भाजपच्याच लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन कसे काय उपलब्ध होते, अशा शब्दांत मुश्रीफांनी भाजपवर टीका केली.