अहमदनगर - गेल्या ५ दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींची आज दुपारी पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट घेत चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली असून या मुलींनी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. जोपर्यत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यां मुलींनी केला आहे.
तोडगा नाही ! राम शिंदेच्या भेटीनंतरही शेतकरी कन्यांचे अन्नत्याग सुरुच
अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींची आज दुपारी पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट घेत चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली असून या मुलींनी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असताना आपल्या गावातील शेतकरी चळवळीचे बाळकडू मिळालेल्या पुणतांबे येथील तीन मुलींनी आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी ५ दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. काल अशक्तपणामुळे एकीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दोघी आंदोलनस्थळीच हट्टाला पेटल्या आहेत. सरकारचे प्रतिनीधी म्हणून आज जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मुलींची भेट घेऊन चर्चा केली आहे. मात्र, मुलींनी मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याचे सांगितले आहे. शुभांगी संजय जाधव, निकिता धनंजय जाधव व पुनम राजेंद्र जाधव या पुणतांबे येथील तिघीही १९ ते २० वयोगटातील युवती आहेत. शुभांगी आणि पुनम बीएसस्सीचे शिक्षण घेत आहेत, तर निकिता लॉचे शिक्षण घेत आहे. तिघीनींही पाच दिवसांपूर्वी पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन (उपोषण) सुरू केले आहे. या आहेत मागण्या - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव मिळावा, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणला उपोषण सुरू असतानाच या तिनही मुली उपोषणाला बसल्या होत्या. हे आंदोलनाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. मात्र, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला. ग्रामस्थांनी भीकमांगो आंदोलन केले. मात्र, तरीही प्रशासनाने त्यांची विशेष काळजी घेतली नाही. पुणतांबे येथून शेतकरी आंदोलनाने महाराष्ट्राला धडा दिला. किसान क्रांती शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली हे आंदोलन झाले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामध्ये धनंजय जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जाधव यांच्या मुली निकिताने वडिलांचा कित्ता गिरवला आहे. युवतींना संघटीत करून तिने शेतकऱ्यांच्या प्रश्न उचलून धरला आहे.